
रॉबिन्सविले, (न्यूजर्सी) – अमेरिकेमधील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे न्यूजर्सीमध्ये रविवारी उद्घाटन करण्यात आले. रॉबिन्सविले शहरामध्ये सुरू करण्यात आलेले हे मंदिर भारताबाहेरील सध्याच्या घडीचे सर्वात मोठे मंदिर असल्याचे मानले जाते आहे. 19 व्या शतकातील महान धार्मिक द्रष्टे भगवान स्वामी नारायण यांचे हे मंदिर नावाप्रमाणेच खऱ्या अर्थाने “महामंदिर’ आहे.
या मंदिराची प्रेरणा भगवान स्वामीनारायण यांचे पाचवे धार्मिक वारसदार प्रमुख स्वामी महाराज यांच्याकडून मिळाली आहे. हे मंदिर न्यूजर्सीमधील रॉबिनविले या अत्यंत छोट्या गावात उभारण्यात आले आहे. तब्बल 183 एकर परिसरामध्ये पसरलेल्या या मंदिराइतके मोठे मंदिर संपूर्ण उपखंडामध्ये कोठेही नसल्याचे मानले जाते आहे.
रविवारी या मंदिराचे औपचाररिक उद्घाटन करण्यात आले. तर दिनांक 18 ऑक्टोबर रोजी हे मंदिर भारतीय आणि अमेरिकेतील सर्वसामान्य हिंदू भाविकांसाठी खुले होणार आहे. “आज महास्वामी यांची 98 वी जयंती देखील आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे.
या अक्षरधाम मंदिराच्या निमित्ताने मंदिराच्या परिसरामध्ये 9 वेगवेगळ्या भक्ती आणि भक्ती शास्त्रांच्या अनुषंगाने वास्तूशांतीचे विधी केले गेले. मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली गेली. आता ही मूर्ती सचेतन झाली असून भक्तांना आशीर्वाद देईल.’ असे विपुल पटेल यांनी सांगितले.
या महामंदिराच्या बांधकामाला 2015 मध्ये सुरुवात झाली आणि महंत स्वामी महारा आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रॉबिन्सविले टाऊनशिपमध्ये 2 दशलक्ष घनफूट दगड ठेवणे सोपे काम नव्हते. हे मंदिर स्वतःच एक सांस्कृतिक मिश्रण आहे, यामध्ये जगभरातून सामग्री आणली गेली, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील नागरिकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन या मंदिराच्या माध्यमातून घडेल असा विश्वासही स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. केवळ संस्कृतीच नव्हे, तर कलेचेही दर्शन घडणार आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी 12,500 कार्यकर्ते झटत होते. बारतातील अन्य अक्षरधाम मंदिरांप्रमाणेच या मंदिराची संरचनाही “बीएपीएस’च्या कार्यकर्त्यांकडून केली गेली आहे.