पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी ही पुण्यातील दुसरी मेट्रो वायरलेस असणार आहे. या मेट्रोच्या रुळांमधून तिला वीजपुरवठा हाेणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या डोक्यावर ना विद्युत तारांचे जंजाळ असेल, ना तिच्या रुळांवर विजेचे खांब असतील. त्यामुळे ही मेट्रो पुण्यासाठी एक अनुपम दृश्य ठरणार आहे.
थर्ड रेल प्रणाली असे या नव्या प्रणालीचे नाव आहे. पुण्यात प्रथमच या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यासंबंधीच्या करारावर ठेकेदार कंपनी व राज्य सरकार यांच्यात नुकताच करार झाला असून, या तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारने मान्यता दिली आहे. परदेशात आता सर्व मेट्रो याच तंत्रज्ञानाने धावत असतात, त्यामुळे भारतातही आता याचा वापर करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुण्यातून करण्यात येत आहे.
थर्ड रेल प्रणाली आहे तरी काय?
‘थर्ड रेल सिस्टिम’ला लाइव्ह रेल, इलेक्ट्रिक रेल किंवा कंडक्टर रेल असेही म्हटले जाते. ही एक अर्ध-सतत कंडक्टरद्वारे ट्रेनला विद्युत पुरवठा करण्याची अत्याधुनिक पद्धत आहे, जी नेहमीच्या रेल्वे ट्रॅकवर धावत्या ट्रेनच्या बाजूने समांतर किंवा रुळांच्या मध्ये बसवली जाते. या प्रणालीच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा प्रदान केला जातो. ही प्रणाली जगभरात मेट्रो गाड्यांना विद्युत पुरवठ्यासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी सिद्ध झालेली आहे.
असे चालते काम
‘थर्ड रेल’ प्रणालीमध्ये मेट्रोच्या नियमित दोन रुळांच्या (ट्रॅकच्या) समांतर तिसरा विशिष्ट पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेला एकेरी रूळ टाकून, त्या मेट्रो गाडीला थेट खालून ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर’ पुरविली जाते. या पद्धतीने धावणाऱ्या गाड्यांना खालच्या बाजूला विद्युत संपर्कासाठी एक खास धातूची पेटी बसवण्यात येते, जिला ‘शूज’ असे म्हटले जाते. या शूजच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा दिला जातो




