पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीतील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाला. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पोहोण्यासाठी आलेले नागरिक, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक अशा 22 जणांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी आठच्या सुमारास घडली.
कासारवाडीत महापालिकेचा जलतरण तलाव आहे. तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅसचा वापर केला जात होता. गॅसची टाकी आणि पाण्याचा संपर्क आला. त्यामुळे तलावात गॅस गळती सुरू झाली. सकाळी पोहोण्यासाठी आलेल्या काही जणांना त्रास होऊ लागला. त्यामुळे पोहोण्यासाठी आलेले नागरिक, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयात जावून उपचारार्थी भेट घेवून माहिती जाणून घेतली. यावेळी क्लोरीन गॅस सिलेंडरला खालच्या बाजूने छिद्र पडल्याने त्यामधून गॅस गळती झाली असल्याचे दिसून आले.




