पिंपरी (प्रतिनिधी) दिवाळी सणाला एक महिन्याचा कालावधी बाकी असून नवरात्र उत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी बोनस म्हणून २० हजार रुपये आणि ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान अशी एकत्रित रक्कम दिला जाणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या लाभ महापालिका आस्थापनेवरील वर्ग एक ते वर्ग चारमधील सर्व अधिकारी त्याचा व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने सन २०२० ते २०२१ आणि त्यापुढील चार वर्षांसाठी दिवाळी बोनससंदर्भात महापालिकेशी एकूण पाच वर्षांसाठी यासंदर्भात करारनामा केला आहे. त्यानुसार दरवर्षी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा २० हजार रुपये दिले जातात. महापालिका आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग ४ अशा ६ हजार ८१९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
वैद्यकीय विभागातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका आणि २०२२-२३ वर्षांत सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. बालवाडी शिक्षक यांना जादा २० हजार रुपये व इतर रक्कम दिली जाणार आहे. मानधनावरील अधिकारी व कर्मचारी, समूह संघटक, तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस दिला जाणार आहे.



