मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाची लढाई निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, या कायदेशीर लढाई व्यतिरिक्त शरद पवार गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी शरद पवार यांची सभा होईल, त्या-त्या ठिकाणी सभा घेण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची लढाई आता अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार गटातील मंत्र्यांना पक्षातील आमदारांची खात्यांसंदर्भातील कामे तत्काळ करून देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्षसंघटनेवर आणि तळागाळातील मतदार पक्षासोबत जोडण्यावर भर देण्याचा अजित पवार गटाने निर्णय घेतला आहे. तालुका, विभागीय मेळावे घेणे, जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करणे, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न त्यांच्या भागातील प्रश्न सोडवण्यावर भर देण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांसह आमदारांनाही देण्यात आल्या आहेत.
शरद पवारांच्या राज्यभरात सभा होणार आहे. त्याची सुरुवातही त्यांनी केली आहे. तर अजित पवार गटही तशा सभा घेणार आहे. पण त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला जात आहे. अजित पवार गटाने आपल्या नऊ मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. तसे नियोजन देखील पूर्ण झाले आहे.
कोणाकडे कोणता जिल्हा ?
अजित पवार – पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
प्रफुल्ल पटेल – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर
छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
दिलीप वळसे पाटील- अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा
हसन मुश्रीफ : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर
धनंजय मुंडे : बीड, परभणी, नांदेड आणि जालना
संजय बनसोडे : हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद
अदिती तटकरे : रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर
अनिल पाटील : जळगाव, धुळे आणि नंदूरबार
धर्मारावबाबा आत्राम : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ



