पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे ‘ड्रीम ११ चे सोमनाथ झेंडे यांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ‘ड्रीम इलेव्हन टीम’ लावली होती. चौथ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले.
सध्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. त्याअंतर्गत ऑनलाइन गेममध्ये झेंडे यांना यश मिळाले. दोन ते तीन महिन्यांपासून त्यांनी ‘ड्रीम इलेव्हन’ गेम खेळण्यास सुरू केली होती. मंगळवारी (ता. १०) बांगलादेश विरूद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ‘ड्रीम इलेव्हन’ची टीम तयार केली. त्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकवला. त्यांच्या खात्यावर दोन- दोन लाख रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे ‘ड्रीम इलेव्हन’सारख्या गेमवर बंदी आणावी, अशी मागणी नेहमी होते. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वारंवार समोर येत असल्यामुळे ऑनलाइन गेमवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिस नेहमीच करतात. मात्र, एका पोलिस अधिकाऱ्याला याचा मोह आवरता आला नाही, अशी चर्चा होत आहे.
चौथ्या प्रयत्नात सुमारे दीड कोटी रुपये बक्षीस मिळाले. या रकमेतील तीस टक्के प्राप्तिकराचे कमी होऊन पैसे मिळतात. बक्षिसाची रक्कम मुलांच्या नावे बँकेत ठेव म्हणून ठेवणार आहे, तसेच गावाकडील जेजुरीजवळील रोमणवाडी या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला बांधकाम, वह्या-पुस्तके व संगणक आदींची मदत करणार आहे.
– सोमनाथ झेंडे, पोलिस उपनिरीक्षक, पिंपरी-चिंचवड




