अकोला : “शाळांचे खासगीकरण सुरू आहे. मद्यसम्राटांच्या हातात शिक्षण संस्था दिल्या जात आहे. ते शाळांमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करतात. यातून नेमके काय साध्य करावयाचे आहे? विद्यार्थ्यांना कोणते संस्कार यातून देणार आहात, असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.
अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. द्राक्षापासून मद्य तयार करणाऱ्या एका कंपनीला नाशिक जिल्ह्यातील एक शाळा चालविण्यासाठी दिली. या कंपनीने शाळेत नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावर टीका करताना शिक्षणाच्या खासगीकरणामुळे काय होईल याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. शैक्षणिक संस्थांचे पावित्र अबाधित ठेवा, अशी विनंती पवार यांनी केली.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,’ असा उल्लेख केला आहे. त्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, ते स्वतःबद्दल संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष असेही लिहू शकतात. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असून, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील हे माझ्यासोबत आहे व आमची भूमिका स्पष्ट आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा करण्याचा प्रस्ताव हा छगन भुजबळ यांचा होता, असा खुलासाही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला


