पिंपरी : हॉटेलच्या मॅनेजरने ग्राहकांना बिल देण्यासाठी स्वत:कडील स्कॅनर देत पैसे परस्पर आपल्या खात्यावर जमा केले. तसेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडूनही पैसे स्वत:च्या खात्यावर जमा करण्यास सांगून हॉटेल मालकाची चार लाख ८७ हजार ५१२ रुपयांची फसवणूक केली.
ही घटना २६ मे रोजी हिंजवडीतील हॉटेल डॉर्टन येथे घडली. याप्रकरणी सुमेरसिंग सागरमल झाझेडीया (वय ३५, रा. वाकड) यांनी मंगळवारी (दि. १७) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आशिष कोंडीबा धेबे (रा. माण रोड, फेज १) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमेरसिंग यांच्या डॉर्टन हॉटेलमध्ये संशयित आशिष जनरल मॅनेजर होता. त्याने हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून स्कॅनरद्वारे ६५ हजार ८३७ रुपये घेतले. तसेच हॉटेल कर्मचारी शाहुराज याच्याकडून हॉटेल व्यवसायाचे ९२ हजार ७८५ रुपयेही खात्यावर घेतले. शिवाय कॅश काऊंटरवरमधील एक लाख २८ हजार ३५० रुपये काढून घेतले. इतर कर्मचाऱ्यांकडूनही पैसे घेत स्वत: वापरले. अशी एकूण चार लाख ८७ हजार ५१२ रुपयांची फसवणूक केली.




