पिंपरी : मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून माजी सरपंच असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. आळंदी येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.
व्यंकट नरसिंग ढोपरे (६५) असे आत्महत्या केलेल्या माजी सरपंचांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकट ढाेपरे हे लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावचे माजी सरपंच आहेत. नऱ्हे आंबेगाव येथे वास्तव्यास असलेला मुलगा संदीप ढोपरे याच्याकडे व्यंकट ढोपरे आले होते.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपाषेण, आंदोलन, मोर्चे निघत असताना व्यंकट ढोपरे यांनी टोकाचे पाऊल उचचले. आळंदीला दर्शनासाठी जाऊन येतो, असे सांगून ढोपरे हे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरून निघाले. दुपारी तीनच्या सुमारास ढोपरे यांचे कपडे धुताना घरच्यांना चिठ्ठी सापडली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी रात्री आठच्या सुमारास इंद्रायणी नदी घाटावर ढोपरे यांची पिशवी व इतर साहित्य मिळून आले. त्यामुळे अग्निशामक दलाने रात्रीच ढोपरे यांचा इंद्रायणी नदीपात्रात शोध सुरू केला. रात्रभर तसेच शनिवारी सकाळी देखील शोध सुरू असताना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास मृतदेह नदीत मिळाला. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.




