मुंबई: राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली. बैठकीला सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षांमधील अनेक मंत्री उपस्थित होते. परंतु, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती मात्र बैठकीला अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली. अशातच संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षण प्रश्नी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे छत्रपतींनी स्वतः यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.
मुंबईतील आज सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकारच्या वतीनं मराठा आरक्षण विषयावर बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला छत्रपती संभाजीराजे अनुपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबतची कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज पहिल्यांदाच बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं होतं चर्चेचा विषय ठरला होता.
सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थित राहण्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असं संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षणापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणं महत्त्वाचं वाटत असल्याचं टीकास्त्र सोडलं आहे.



