सातारा : सातारा, बारामती, शिरुर आणि रायगड या आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणार आहोत. त्याचसोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत येथील राष्ट्रीय अधिवेशनात जाहीर केले. अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ आता चर्चेचा विषय ठरू लागला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सातारा जिल्हा हा नेहमीच पवार कुटुंबियांच्या पाठीशी राहिलाय. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनही सातारा जिल्ह्याचा राज्यात दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे स्वतंत्र गट तयार झाले आहेत. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पाटील यांची प्रकृती, वय पाहता शरद पवार गट या ठिकाणी उमेदवाराच्या शोधात असून महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तीन ते चार नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते.



