मुंबई : महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देणार होते. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार होते. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावरून प्रचंड राजकीय गदारोळ झाला. यावर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली, अशी माहिती चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.
रविंद्र चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे.



