मुंबई : – आरोग्य विभागात या सरकारने ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकांना काम मिळवून देऊन, यामध्ये मंत्र्यांशी पार्टनरशीप आहे. आरोग्य विभागाच्या १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेबाबतचे कंत्राट १० वर्षांसाठी देण्यात आले आहे. याची १० वर्षांची किंमत काढल्यास त्यावर केवळ ४ हजार कोटींचा खर्च होतो. परंतु शिंदे सरकारने राज्याची लूट सुरू ठेवली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, ८ हजार कोटींचे टेंडर या सरकारने केवळ ७ दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर काढले आहे. त्यामुळे या सरकारने लूट माजवली आहे. कोणत्याही बाजूने आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेचा १० वर्षांचा खर्च काढला तरी तो ४ हजार कोटींच्यावर जात नाही. मग ८ हजार कोटींचे टेंडर का पास केले जात आहे. यासंबंधी मी सरकारला पत्र लिहिणार आहे. त्यांनी हे टेंडर ताबडतोब थांबवयाला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. ८ हजार कोटींचा टेंडर हा कधी सात दिवसांत काढला जात नाही.
या टेंडरमध्ये असणाऱ्या सर्व अटी आणि शर्ती या मंत्र्याच्या नातेवाईकांच्या बाजूने असतील, असा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात आता मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे. तसेच या तक्रारीद्वारे टेंडर रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआमध्ये होणाऱ्या जागावाटपाबाबत विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले की, जागावाटप अजून अंतिम टप्प्यात आलेले नाही. ज्या जागेवर जो पक्ष मजबूत आहे त्याला ती जागा दिला जावी, असे सर्वांचे म्हणणे आहे. त्यामुळे जागावाटपाबाबतचा निर्णय एकमताने घेतला जाईल.



