पिंपरी, (प्रतिनिधी)- महापलिकेच्या २२ शाळा आणि अनेक खासगी शाळांकडे पुरेसे मैदान आणि जागा नसल्याने २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदन, ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येत नाही. पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी व्हरांडा आणि वर्गातून ध्वजवंदन करतात, तर खासगी शाळांमध्ये प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन आठवी व नववीच्या मुलांना बोलविले जाते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक आणि माध्यमिकच्या सुमारे २२ शाळांना पुरेशी जागा उपलब्ध नाही. तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. या शाळेत सर्वसामान्य गोरगरीब मुले शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्याकडे कल आहे. प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त इतर शाळांमध्ये शाळा विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. मात्र, पालिकेच्या २२ शाळा व काही खासगी शाळांकडे ना मैदाने आणि पुरेशी जागा नसल्याने या शाळांमध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत.
अशा शाळांमध्ये शिक्षक आणि ठराविक विद्याथ्यांवरच ध्वजवंदन करून घेण्याची वेळ येत आहे. विद्यार्थ्यांना बोलावलेच तर त्यांना वर्गातूनच उपस्थित राहण्यास सांगितले जाते. त्यामुळे शाळांना मैदानाची अथवा पुरेशा जागेची सोय कधी होणार? असा सवाल विचारला जात आहे.
काही विद्यार्थी क्रीडा निपुण आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेत असतानाच चांगली क्रीडांगणे असतील तर त्यांचा सरावही उत्तम होईल. महापालिकेच्या मराठी, उर्दू, प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच ठिकाणी आहेत. या दोन ते तीन शाळांना एकच मैदान वापरले जाते. तर काही शाळांची मैदाने छोटी आहेत. यामध्ये शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी हे चारचाकी वाहने घेऊन येतात. ही वाहने शाळेतील मैदानावरच पार्क केली जातात.
ज्या शाळांना मैदाने नाहीत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन ध्वजवंदन करण्यात अडथळे येत आहेत. मात्र, उपलब्ध व्हरांड्यात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच वर्गातूनच विद्यार्थी ध्वजवंदन करत आहेत.
- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग




