पिंपरी (प्रतिनिधी) राज्यातील महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून, त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. यामध्ये पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह वेल्हे, हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यांमध्ये सुमारे २९ लाख प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे बील भरले नाही, म्हणून वीज पुरवठा खंडीत झाला, अशा तक्रारी आता राहणार नाहीत.
ग्राहकांना विजेच्या खर्चावर नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे पाऊल महावितरणने उचलले आहे. नवीन स्मार्ट मीटर बसवण्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच हे प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
मोफत मिळणार मीटर
ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे. नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येईल. तसेच प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की, वीज पुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल.
मोबाइलवरून ऑनलाइनपेमेंटचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाइलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे.
मोबाइलप्रमाणे पैसे भरून वापर
स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहक मोबाइल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईलवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजेल.




