पिंपरी (प्रतिनिधी) – खरेदीखतामध्ये ठरवून दिलेल्या नियम व अटीप्रमाणे अभिहस्तांतरण व अॅमेनिटीज न देता सोसायटीतील सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर वाकड पोलीस ठाण्यात फसवणूक व महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना २ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०१४ दरम्यान ताथवडेत घडली. याबाबत दयानंद रवाळनाथ पाटील (वय ३८, द नुक हाऊसिंग सोसायटी, ताथवडे) यांनी फिर्याद दिली. त्यावरून पिरॅमिड डेव्हलपर्सचे संचालक खेमचंद उत्तम भोजवानी, पिरॅमिड डेव्हलपर्स यांचे भागीदार, प्रथमेश डेव्हलपर्स व त्याचे भागीदार व गृहप्रकल्पाचे जमहन मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर सदनिकाधारकांना आरोपींनी खरेदीखतामध्ये बॅकवेट हॉल, स्केटींग रिंग व बॅडमिंटन कोर्ट बांधून देण्याचे आश्वासन देऊन सदनिकाधारकांकडून त्यासाठी रक्कम घेतली होती. मात्र, सदर मेनिटीज सोसायटीला दिल्या नाहीत. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मंजूर आराखड्यानुसार नियोजित जागेऐवजी वेगळ्याच ठिकाणी बांधला. त्याचबरोबर मेंटनन्स चार्ज म्हणून प्रत्येक सदनिकाधारकांकडून दोन वर्षांसाठी सुमारे ५० हजार प्रमाणे रक्कम घेतली. मात्र, सोसायटी हस्तांतरित करूनही या पैशाचा हिशेब दिला नाही.




