मुंबई :पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारात शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता महत्त्वाची माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबाराची ही घटना घडली होती. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांसमोर सहा गोळ्या झाडल्या. आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आहे.
स्थानिक पातळीवरील राजकारण आणि जागेच्या वादातून हा गोळीबार झाला होता. महेश बरोबर राहुल पाटील हे सुद्धा गोळीबारात जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या. जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे.
महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुपिटर रुग्णालयात पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहेत.



