शिरूरची जागा राष्ट्रवादीलाच?; वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीची ‘इनसाइड स्टोरी’
लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचा अवधी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपसाठी हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. बैठकीत शिरूरची जागा महायुतीकडून राष्ट्रवादीलाच देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
शिरूरमधून तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करत राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली होती. मात्र पराभवानंतरही आढळराव पाटील यांनी न खचता मतदारसंघातील आपला जनसंपर्क कायम ठेवला होता आणि यंदाही आपण निवडणूक लढवणारच, या भूमिकेवर ते ठाम होते. मात्र मागील पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. आधी झालेली महाविकास आघाडी आणि नंतर झालेल्या महायुतीचा फटका आढळराव पाटलांना बसला.
शिरूर मतदारसंघातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी ही जागा महायुतीकडून आम्हीच लढवणार अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यातच शिवाजीराव आढळराव पाटलांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र तरीही आढळराव पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. परंतु काल रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ही जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.



