चाकण : येथील औद्योगिक वसाहतीतील चाकण,महाळुंगे पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी गेले पंधरा दिवसापासून उपलब्ध नाहीत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाकण, महाळुंगे येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गुन्हे शाखेत केल्या आहेत . पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात विशेषत: पुणे जिल्ह्यात अतिसंवेदनशील असणाऱ्या पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी नसल्यामुळे पोलीस ठाण्यात नेमके काय चालले हे कळत नाही असे वास्तव आहे. प्रभारी अधिकारी दिलेले असले तरी त्यांनाही मर्यादा आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याला केव्हा मिळणार असा सवाल नागरिकांचा, उद्योजकांचा आहे.
पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुणे जिल्ह्यामध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण, महाळुंगे पोलीस ठाण्याला विशेष महत्त्व आहे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील गुन्हेगारीचा आलेख मोठा आहे. घातक शस्त्र, पिस्तूल,गावठी कट्टे,तलवारी, गांजा बाळगणाऱ्या पासून खून, दरोडे, लूटमारीचे तसेच खंडणी, हप्ते मागणी व इतर प्रकार सातत्याने घडत असतात.महिलांच्या छेडाछेडीचे प्रकार सातत्याने घडत असतात.




