भोसरी: आयात उमेदवाराला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणारा असाल तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया भोसरी विधानसभेचे माजी आमदार, शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असणारे विलास लांडे यांनी पक्षाला दिली आहे. तर दुसरीकडे शिरूर भाजपसाठी सोडून आमदार महेश लांडगे यांना तिकीट द्यावे आम्ही त्यांचे काम करू असे सांगत त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा विचार केला आहे.
२०१९ मध्ये झालेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या सांगण्यावरून अमोल कोल्हे यांचे मी प्रामाणिकपणे काम केलं. आतादेखील आयात उमेदवाराला उमेदवारी मिळणार असेल, तर काही गोष्टींचा विचार करावा लागेल, असा थेट इशारा विलास लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
विलास लांडे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून मी इच्छुक आहे. २००९ पासून ते आजतागायत शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहे. काही गोष्टी नेत्यांच्या निर्णयानंतर बदलाव्या लागतात. तस वागावं लागतं. आगामी २०२४ शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. यात राजकीय परिस्थिती उलटसुलट झाली आहे. २०१९ ला सुद्धा या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केली. चार महिने मतदारसंघात फिरलो. वातावरण निर्मिती केली. ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या भूमिकेतील आकर्षण ठरलेले अभिनेते अमोल कोल्हे यांची एन्ट्री झाली. त्यांना उमेदवारी देण्यात आली. तरी अजित पवारांच्या शब्दामुळे त्यांचे प्रामाणिकपणे मी काम केले. एवढं सगळं केल्यानंतर आयात उमेदवाराला उमेदवारी देणार असतील तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवारांना दिला आहे.
विलास लांडे यांनी ताठरती भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटापुढे पेच निर्माण होऊ शकतो. असाच पेच त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निर्माण केला होता. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती न लढता अपक्ष उमेदवार होवून लांडे यांनी स्वतःचे राजकीय करिअरला ब्रेक लावला होता. माजी आमदार विलास लांडे यांच्या देव्हाऱ्यात शरद पवार आणि निकटवर्तीय अजित पवार आहेत.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पक्षाने आदेश दिल्यास राष्ट्रवादी पक्षाकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपचे प्रदीप कंद यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर आपण शिरूर लोकसभा लढवू असे सांगत महायुतीचे उमेदवार आपणच असू असे अप्रत्यक्ष जाहीर केले आहे. यामुळेच विलास लांडे यांनी आक्रमक भूमिका घेत किमान भोसरी विधानसभा मतदारसंघ सेफ करण्यासाठी कोणता राजकीय डाव टाकला आहे हे राजकीय जाणकार ओळखतील…..
काय म्हणाले विलास लांडे?
गेली 35 वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी 2009 साली लोकसभा लढलो आहे. 2019 ला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आले. मी १० वर्ष आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे. माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
महेश लांडगेना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं
ते पुढे म्हणाले की, अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजीराव आढळरावांना आयात करू नये. त्याऐवजी एकतर मला संधी द्यावी. अथवा थेट भाजपला जागा सोडून, महेश लांडगेंना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं, आम्ही त्यांचे काम करू, असे विलास लांडे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आंबेगाव तालुक्याने आमदारकी सोबत खासदारकी एकाच मतदार संघात ठेवण्याची जशी व्यवस्था केला होती तोच कित्ता भोसरीकर गिरवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र दोन नेतृत्व यांनी एकमेकांना टाळी दिली तर हे शक्य आहे असेही राजकीय जाणकार सांगतात.




