पिंपरी : झटपट कोट्याधीश होण्याचा मोह पिंपरी- चिंचवड पोलिस दलातील एका फौजदाराच्या अंगलट आला आहे. नाकाबंदीत मिळालेले ड्रग्ज विक्री करताना फौजदार जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून सुमारे ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह राज्यभर एकच खळबळ उडाली आहे
विकास शेळके (नेमणूक- निगडी पोलिस ठाणे), असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नमामी शंकर झा ( वय ३२, रा. निगडी, मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर सांगवी पोलिसांनी सापळा रचून नमामी शंकर झा याला दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत उपनिरीक्षक विकास शेळके यांनी हे ड्रग्स त्याच्याकडे दिल्याचे समोर आले. त्यांच्याकडून एकूण ४५ कोटी रुपये किंमत असलेले ४५ किलो मेफेड्रोन आतापर्यंत जप्त करण्यात आले आहे.




