नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी महाशिवरात्र निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे चारपासून शनिवारी रात्री नऊपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपातून व त्यांच्या दोन्ही बाजूंमध्ये करण्यात आली आहे. तातडीने दर्शन घेण्यासाठी देणगी दर्शन सुरू राहणार आहे.



