पिंपरी, दि. १२ मार्च २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय विमा लागू करण्यात आल्याने र. रू. २० लाखांपेक्षा जास्त वैद्यकीय उपचार व शासनमान्य ५ गंभीर आजारांसाठी र. रु. ५ हजाराचे वरील ओपीडी स्वरूपातील औषधोपचार खर्चास तसेच वैद्यकीय वैद्यकीय खर्चाकामी स्वतंत्र मनपा फंड तयार करण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने – १४ वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यासाठी आणि याकामी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास आज प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच महापालिका हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजना राबविण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिका प्रभाग क्र. ३ मधील चोविसवाडी, वडमुखवाडी विविध ठिकाणी स्थापत्य विषयक कामांची दुरूस्ती करण्यासाठी तसेच महापालिकेच्या इ प्रभागात विविध पाण्याच्या टाक्यांचे रेट्रोफिटींगची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सन २०२३-२४ करिता पिंपळे सौदागर पूल ते दापोडी एम. एस. गुरूत्ववाहिनी वरील देखभाल दुरूस्तीची कामे करणे, वॉल्व बदलणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी तसेच महापालिका प्रभाग क्र. २९ पिंपळेगुरव, प्रभाग क्र. २६ विशालनगर, पिंपळेनिलख येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या जुन्या हद्दीतील सुधारित मंजुर विकास योजनेतील सि. स. नं. ४८६५ (पै) संत तुकाराम नगर, पिंपरी येथील आरक्षण क्र. ५७ एचडीएच या प्रयोजनार्थ आरक्षित क्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. २५ पुनावळे गाव, ताथवडे व पुनावळे परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते एमपीएम पद्धतीने विकसित करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सन २०२३-२४ करिता पिंपळे गुरव डायनोसोर गार्डन पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात नवीन पाईपलाईन टाकणे तसेच इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आणि ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सन २०२३-२४ करिता पिंपळे गुरव कांकरिया गॅस गोडाऊन पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात नवीन पाईपलाईन टाकणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या प्रभाग क्र. २ मधील मनपा इमारतींची दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. १० संभाजीनगर व इतर परिसरात पावसाळी गटर्स, स्टॉर्म वॉटर व फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी आणि लोकसेवा स्वयंसहायता महिला बचत गट यांचे सामुदायिक आण सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता व देखभाल दुरूस्तीचे कामकाजाबाबत येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या वतीने आजपासून धन्वंतरी योजना बंद करून वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली. स्थायी समिती बैठकीवेळी वैद्यकीय विमा योजनेतंर्गत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर काही महापालिका कर्मचाऱ्यांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.
या वैदयकीय विमा योजनेंतर्गत धन्वंतरी योजनेतील सर्व लाभ कर्मचाऱ्यांना जसेच्या तसे मिळणार आहेत. धन्वंतरी योजनेप्रमाणेच सर्व रुग्णालयीन उपचारांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असून सर्व प्रकारच्या आजारांसाठी ही योजना लागू असणार आहे. महापालिका निकषांनुसार सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना सध्या कार्यरत असणाऱ्या योजनेप्रमाणेच उपचार मिळणार आहेत. विमा योजनेमध्ये प्रति कुटुंब प्रतिवर्ष २० लाख रुपयांपर्यंतचा खर्च विमा कंपनीमार्फत देय असणार आहे. तसेच २० लाख रुपयांपुढील खर्च आयुक्त यांच्या मान्यतेने महापालिकेच्या वतीने अदा करण्यास मान्यता असणार आहे. या विमा योजनेमध्ये दवाखान्यात दाखल होण्यापुर्वी ३० दिवस आणि पश्चात ६० दिवसांचा खर्च मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असणाऱ्या सर्व आजारांसाठी रेफरचिटची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी हेल्थकार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर विमा पॅनेलबाहेरील रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यास हेल्पडेस्कला कळविणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर हेल्थ डेस्क रुग्णास सहकार्य करण्यास तत्पर असणार आहे. मनोविकारावर तसेच मनोवैज्ञानिक रोग यांवर गरज भासल्यास ओपीडी स्वरूपातील उपचारासाठी २५ हजार रुपये देय असणार आहे. गरज भासल्यास आयपीडी उपचाराची सुविधाही देण्यात येणार आहे.
ओपीडी स्वरूपात बाह्य रुग्ण तपासणी करण्याची गरज भासल्यास प्रती कुटुंब प्रती वर्ष ५००० रुपये पर्यंत रक्कम उपलब्ध असणार आहे. तसेच शासनमान्य ५ गंभीर आजारांवरील ओपीडी स्वरूपातील औषधोपचारासाठी ५००० रुपये इतकी मर्यादा असणार आहे. विमा योजनेमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण, अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार विमा संरक्षण देण्यात येणार असून हा लाभ केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. फिजीओथेरपीचे ओपीडी स्वरूपातील शुल्क केवळ ६० दिवसांपर्यंत देय असणार आहेत. तसेच विमा योजनेंतर्गत मद्यपान केल्यामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार देय नाहीत असे योजनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, बैठकीदरम्यान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महापालिकेच्या क्रिडा प्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम वायळ, पर्यवेक्षक रंगनाथ गुंजाळ तसेच माध्यमिक शिक्षण विभाग अध्यक्ष अंकुश चव्हाण यांचा सत्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते तसेच शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आला.




