पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील अनेक उद्यानामध्ये सकाळच्या वेळी अनेक नागरिक, लहान मुले मॉर्निंग वॉक, वेगवेगळे खेळायचे प्रकार करत व्यायाम करताना दिसतात. मात्र, दुसरीकडे लहान शाळकरी मुले व युवक व्यायाम न करता स्वतःच्या मोबाईल मध्ये डोके घालून ऑनलाईन गेम खेळण्यात वेळ घालवतात. असे विदारक चित्र शहरातील अनेक उद्यानात दिसत आहे.

त्यामुळे आजची युवा पिढी कमजोर होत चालली आहे. मध्यम वयीन नागरिक, महिला स्वतःची शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम करताना सर्वाधिक दिसतात. कोविड महामारी मुळे नागरिकांना आरोग्याचे महत्त्व समजले आहे. त्यातच कमी वयात हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, शुगर, अर्धांग वायू, थकवा असे अनेक आजाराने लोक बाधित झाले आहेत. आज १०० पैकी १० टक्के लोक ६० वर्षापेक्षा जास्त जगतात असा काही रिपोर्ट नुकताच एका संस्थेने व्हायरल केला आहे. त्यामुळे मध्यम वयीन नागरिक तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी उद्यानात शारीरिक व्यायाम करताना दिसतात.

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. मुलं अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात आणि इंटरनेट वापरतात. त्यामुळे मुलांचं नापास होण्याचं प्रमाण हे वाढतच आहे. सकाळी उद्यानात मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत फिरायला गेल्यावरही अनेकजण मोबाईलवरच असतात आणि त्यामुळे आपापसातील संवाद तुटतो. उद्यानात शारीरिक व्यायाम न करता मुले तासनतास मोबाईल मध्ये डोके घालून ऑनलाईन गेम खेळण्यात वेळ घालवतात. याचा परिणाम त्यांच्या तब्बेतीवर नक्कीच होणार आहे.




