बारामती : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोदींचे कौतुक केले. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मात्र अजित पवार यांनी अप्रत्यक्ष तोड डागली. कुणी काहीही सांगू द्या, येणार तर मोदीच… काही जण तुम्हाला भावनिक करतील पण तुम्ही ‘विकास’ एवढंच डोक्यात ठेवा, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार बारामतीकरांना उद्देशून म्हणाले की, “मी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनुभवतोय, सगळीकडे मोदी लाट आहे. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत. तेव्हा त्यांच्याच विचाराचा बारामतीतून खासदार निवडून आला पाहिजे. कोणी काहीही सांगितले तरी मोदीच पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
वरिष्ठांचे फोन येतील, मतदारांनो भावनिक होऊ नका, विकासाला साथ द्या
तुम्हाला वरिष्ठ नेते फोन करतील, आताही करताहेत. काही काही जणांचे पंधरा वर्षे फोन आले नाहीत, परंतु आता फोन येत आहेत. कसं चाललंय काय चाललंय असे म्हणतायेत. फोन आल्यानंतर तुम्ही भावनिक होऊ नका. मी विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय, मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर मत मागत नाही. मी तुमचा विकास केलेला आहे, असे अजित पवार म्हणाले.



