मुंबई : वाढीव वीजबिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार आहे. एप्रिलपासून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने महावितरणचे सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात जवळपास 6 लाख 19 हजार स्मार्ट मीटर लागणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.
महावितरण प्रशासनाकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची गती वाढविली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील सूचना दिल्या असून, ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर ग्राहकांना मोबाइल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे. विजेसाठी किती खर्च करायचा, हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे. जिल्ह्यात स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून एप्रिलपासून जिल्ह्यात स्मार्ट मीटर लागण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.



