पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आजही अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होताना पाण्याला दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना घशाचे आजार होऊ लागले आहेत. उन्हाळ्यात पाणी संकट तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठा यामुळे नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.
मोशी, चिखली, काळेवाडी, थेरगाव, आकुर्डी परिसरातील गावठाण, विविध सोसायट्या, वाड्या-वस्त्यांना महापालिकेकडून पिण्याचे अशुद्ध पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्याचप्रमाणे पाण्याचा दाबही कमी झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असताना आठवड्यातून एकदा पाणी सोडण्यात येत असून, दुसरीकडे हे पाणीही दूषित झाले आहे. दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
सोसायटीतील नागरिकांकडे घरात वॉटर फिल्टर/ प्युरिफायर आहेत. मात्र, तरीदेखील या पाण्याचा रंग, वास आणि चव बदलली आहे. प्युरिफायरच्या फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला जात आहे. मोशी, बोराटे वस्ती ते टोलनाक्यापर्यंत सर्वांना अशाच प्रकारचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे, नागरिकांना नाईलाजास्तव बाटली बंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. तोच प्रकार बहुतांश परिसरात पाहण्यास मिळतो. अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनही त्यावर अपेक्षित कार्यवाही होताना दिसत नाही




