बीड : भाजपकडून बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव घोषीत केलं आहे. विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. यावेळी पंकजा मुंडे यांंना मंत्री धनंजय मुंडे यांची ताकद मिळणार आहे. तसेच महायुतीकडून पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचीही जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर दिली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यात आष्टी मार्गे होणाऱ्या आगमना प्रसंगी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचे पालकत्व यावेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी एक बैठक घेतली.
दरम्यान, महायुतीचा उमेदवार ठरून आणि प्रचाराशी दिशा निश्चित झालेली असताना महाविकास आघाडीत मात्र, जागा कोणाला सोडायची, याविषयीचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीकडून बीडची जागा ही शरद पवारांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या बीड लोकसभेतून शरद पवार उमेदवारांची चाचपणी करतांना दिसत आहे. यातच भेटीगाठीही वाढल्या आहेत.



