राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला आहे. धाराशिव लोकसभेसाठी विधानपरिषद आमदार विक्रम काळे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभेसाठी विक्रम काळे आणि नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आज सकाळीच विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली आहे.
हेमंत गोडसेंचं काय होणार?
मागील काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून शिंदेसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यामान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अशात महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे निश्चित समजले जात असल्याने हेमंत गोडसे यांचे काय होणार? आणि त्यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.



