परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून आज रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला जाईल आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून रंगत होती.
मात्र ऐनवेळी महादेव जानकर यांचा महायुतीत समावेश करण्यात आला आणि त्यांना परभणीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राजेश विटेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज महादेव जानकर यांच्यासाठी घेण्यात आलेल्या महायुतीच्या सभेत अजित पवार यांनी विटेकर यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला आहे.



