पणजी : शेअर मार्केटमध्ये नामांकित कंपन्यांचे प्रमाणपत्र दाखवून, त्याचे ब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या परराज्यातील ठकसेनच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी आवळल्या. शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सतत ठिकाण बदलणाऱ्या ठकसेनला गोव्यातील पणजीमध्ये अटक केली आहे.
युवराज बाळकृष्ण पाटील (४२, रा. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित युवराज याने देवळाली कॅम्प परिसरातील माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना आमिष दाखवून १ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला होता.
याप्रकरणी माजी सैनिक संजय बिन्नर यांच्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलिसात २०२३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. माजी सैनिक बिन्नर यांची २०२० मध्ये संशयित युवराज व राहुल शंकर गौडा पाटील यांची ओळख झाली. त्यावेळी संशयित युवराज याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी ॲक्युमेन व गुडविल या कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून स्वत: ला त्या कंपनीचे ब्रोकर असल्याचे त्यांना सांगितले.
गुंतवणुकीवर ४ टक्के दरमहा परताव्याचे आमिषही दाखविले. त्यानुसार बिन्नर व त्यांच्या साथीदारांनी गुंतवणूक केली. ऑगस्ट २०२० पर्यंत त्याने परतावाही दिला. त्यानंतर परतावा दिला नाहीत. बिन्नर यांनी विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याची व्याप्ती पाहता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक तपास करीत होते.
अखेर तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून संशयित युवराज पाटील यास गुंडाविरोधी पथकाने गोव्यातील पणजीमध्ये अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे ७ मोबाईल, १ लाख ९० हजारांची रोकड व पासपोर्ट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हेशाखा करीत आहे.



