
जळगाव : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. भाजपकडून लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज होते. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे.
खासदार उन्मेष पाटील यांच्या हाती शिवबंधन
उन्मेष पाटील यांनी कालच मुंबईत संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यानंतर त्यांचा आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याचे सांगण्यात येतं आहे.
मी जात्यात आहे अनेकजण सुपात – उन्मेष पाटील
ही लढाई पदाची जय-विजयाची नाही, ही लढाई आत्मसन्मानाची आहे. विकासाची लढाई आहे. तिथे आत्मसन्मान, संवाद होत नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. आज मी जात्यात आहे, तर अनेकजण सुप्यामध्ये आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात सुप्यातील अनेकजण पुढे येतील, असे उन्मेष पाटील यांनी पक्ष प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.



