कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मताची विभागणीत दोन्हीपैकी एकाच विजय होतो की या परिस्थितीचा फायदा मिळून खासदार धैर्यशील माने पुन्हा संसदेत पोहचतात याला महत्त्व आले आहे. वंचितचे डी. सी. पाटील यांच्या उमेदवारीमुळे कोण घायाळ होणार याचे कुतूहल असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे मतदारसंघात राजकीय कुरिक्षेत्रावरील मातब्बर नेत्यांच्या नावांची शर्यत लागली आहे. तसा हा मतदारसंघ राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिला आहे. येणारी निवडणूकही त्याला अपवाद ठरणार नाही, अशाच काहीशा राजकीय घडामोडींची चर्चा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात रंगताना दिसत आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीची उमेदवारीतील संदिग्धता, महाआघाडीबरोबरचा दुरावा स्पष्ट करीत माजी खा. राजू शेट्टी यांनी मांडलेला सवता सुभा, राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघाची सुरू केलेली चाचपणी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मतदारसंघावरचा नैसर्गिक दावा, अशा एकंदर राजकीय ‘मिसळ’मधून अनेक नावांची सद्या घुसळण सुरू आहे
हातकणंगले मध्ये उमेदवारी कोणाला मिळणार हे दिवसेंदिवस जटिल बनत चालले होते. अखेर काल उद्धव ठाकरे यांनी पक्ष चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला. आता ही लढत प्रामुख्याने चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यात रंगणार आहे. सर्व उमेदवार तुल्यबळ असल्याने मतदारांचाही गोंधळ उडवा अशी परिस्थिती आहे.



