यवतमाळ : राजकारणात काही समीकरण करावे लागतात. मी कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याने दिलेला शब्द पाळणारा आहे. भाऊ म्हणून भावना गवळी यांच्या पाठीशी सदैव राहीन. त्यांचा योग्य सन्मान कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भावना गवळी मात्र या सभेला अनुपस्थित होत्या.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. यानंतर यवतमाळातील समता मैदानावर झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार अशोक उईके, आमदार नीलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, आमदार लखन मलिक, आमदार अर्जून खोतकर, उमेदवार राजश्री पाटील, वसंत घुईखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी भाजपशी युती केली. काँग्रेसशी कधीही संग करणार करणार नाही असे ते सांगत असत. २०१९ मध्ये बाळासाहेब आणि मोदी यांचा फोटो लावून निवडणुका जिंकल्या. जनतेचा कौलही मिळाला. नंतर बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसशी आघाडी केली. हे पाहून माझ्यातील शिवसैनिक जागा झाला आणि मी उठाव केला. राज्यात एकाच विचाराचे आणि सर्वसामान्यांचे सरकार आणले, असा दावाही त्यांनी केला.



