नाशिक – राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवानिवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत. मात्र, मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्याने गुरुवारपर्यंत (दि. ४) पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची पेन्शन रक्कम सध्या रखडली आहे.
राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांमध्ये तसेच निम्न सरकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनाला तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला आहे. मार्च एंड आणि ई-कुबेर यंत्रणा अद्ययावतीकरण यामुळे वेळेत निधी न मिळाल्याने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कोषागार कार्यालयात त्याबाबत चौकशी करण्यात येत असून, पेन्शन जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत सरासरी ६ तारखेचा अवधी लागू शकेल, असे सांगितले जात आहे. राज्यातील २७ कोषागार कार्यालयांमध्ये सुमारे ६ लाख ७५ हजार निवृत्त कर्मचारी आहेत.



