रहाटणी, ५ एप्रिलः कुस्ती क्षेत्रात राज्यपातळीवर स्वतःचे व आपल्या गावचे नावलौकिक मिळविणारे, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा आणि सांप्रदायिक क्षेत्रात स्वताला झोकून देण्याऱ्या कुटुंबातील, काळ्या व लाल मातीतील रहाटणी गावाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व पै. जंगल हनुमंत कोकणे आज काळाच्या पडद्याआड गेले. खऱ्या अर्थाने कुस्ती क्षेत्राने एक मल्ल आणि मार्गदर्शक गमावला आहे.
पै. जंगल हनुमंत कोकणे हे शेती, दुधव्यवसाय आणि गुळ हा वडिलोपार्जित व्यवसाय करत होते. तसं पाहिलं तर संपूर्ण कोकणे कुटुंबाचे कुस्ती, सामाजिक आणि सांप्रदायिक क्षेत्रात कायमच मोठे योगदान राहिले आहे. पैलवान जंगल कोकणे यांना घरातूनच कुस्तीचे धडे मिळाले. वडील हनुमंत कोकणे व चुलले राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते श्रीराम कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आखाडे गाजवायला सुरवात केली.
चुलते धोंडीबा कोकणे हे त्याकाळचे अस्थी तज्ञ होते. तर यशवंत कोकणे हेही पंचक्रोशीतील नामांकित कुस्तीगीर होते. त्यामुळे पै. जंगल कोकणे यांनी वयाच्या १९ व्या वर्षी कुस्तीचे धडे गिरवायला चालू केले. वस्ताद बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील कुंजीर तालमीत त्यांनी स्वतःवर कुस्तीचे संस्कार करून घेतले. १९७३ साली दिल्ली येथे झालेल्या ग्रामीण क्रीडा महोत्सवात ६५ ते ७० वजनी गटात त्यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. कुस्ती सोबतच त्यांनी १९७५ साली पदमजी मिल येथे काम देखील केले.
वडिलोपार्जित आलेला शेती व्यवसाय आणि वैचारिक विचारांचा वारसा त्यांनी कायम जोपासला, काळानुसार व समाजाच्या प्रवाहानुसार त्यांनी स्वतामध्ये बदल करून घेतले. कुटुंबातील सदस्यांनी उब शिक्षण घेत उद्योग व्यवसायात अमुलाग्र बदल करून घेतला. संप्रदायाची परंपरा कायम जोपासली. स्वतः पै, जंगल कोकणे यांनी पायी पंढरपूर वारी केली.
आजदेखील त्यांचे बंधु पै. महादेव हनुमंत कोकणे व पै. दौलत हनुमंत कोकणे पायी वारीची परंपरा जोपासत आहेत. पंचक्रोशीतील एक सुसंस्कृत व प्रगतशील शेतकरी कुटुंब म्हणून आज त्यांच्या कुटुंबाकडे पाहिले जात्ते, पै. जंगल कोकणे यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपले उभे आयुष्य कुस्ती क्षेत्र, कुटुंब आणि समाजासाठी दिले. त्यांच्या पाटीमागे मुलगा, मुलगी, पुतणी, पुतण्या आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.




