मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी मधील प्रमुख सहा प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून अंतर्गत खदखद सुरू आहे. काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे पत्ते कापले गेले आहेत तर काही ठिकाणी उमेदवारांची पळवा पळवी सुरू आहे.
काही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ द्या अशा वर्गना होत आहेत. याचा थेट फटका माहिती अथवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात हे नाराजीनाटय़ अधिक रंगल्याचे चित्र आहे. काँग्रेसमध्ये सांगली, भिवंडी मतदारसंघ आणि अनेक ठिकाणी उमेदवारी वरून अस्वस्थता शमलेली नाही. याखेरीज राष्ट्रवादीचे दोन्ही गट, ठाकरे गट या पक्षांतही काही प्रमाणात नाराजी आहे.
राज्यात पाचापैकी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली आहे. एरवी बहुतांश नेत्यांचा कल हा विधानसभा लढण्याकडे असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत फारशी चुरस बघायला मिळत नाही. मात्र यंदा काहीसे वेगळे चित्र निर्माण झाल्याचे दिसते. महायुतीतील भाजप, शिंदे गट, अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट आणि अगदी वंचित बहुजन आघाडीमध्येही उमेदवारीवरून चुरस बघायला मिळत आहे. काही लोकसभा मतदारसंघात वंचित ने उमेदवारी दिल्याने राजकीय गणितेे ही बदलणार आहेत.



