पिंपरी (प्रतिनिधी) आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील टी-२० क्रिकेट सामन्यावर बेटिंगचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला आहे. वाकड पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) रात्री सव्वानऊच्या सुमारास कारवाई करून १० संशयितांना अटक केली. तसेच सहा लाख ५८ हजार रुपयांचे बेटिंगसाठीचे साहित्य जप्त केले.
सूर्यप्रताप कौशल्य सिंग (वय १८), राजेश छोटेलाल कुराबहू (वय २५), शुभम पुलसी धरू (वय २२), तिलेश अमितकुमार कुरेह (वय २५), जितू नवीन हरपाल (वय २८), राहुलकुमार प्रकाश कुमार उराव (वय २२), यश प्रसाद शाहू (वय १८), किशन मनोज पोपटानी (वय २२), समया सुखदास महंत (वय २६, सर्व रा. छत्तीसगढ), रणजित सरजू मुखीया (वय २०, रा. पुनद, ता. घनशामपूर, जि. दरभंगा, बिहार), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
त्यांच्यासह कार्तिक उर्फ दिनेश आहुजा (रा. नागपूर), रामू बोमन (छत्तीसगढ) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक सुनील काटे यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांनी वाकड येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये बेटिंग सुरू केले होते.



