नागपूर : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडूनच तीव्र विरोध करण्यात येत होता. यामुळे या ठिकाणी महायुतीकडून नेमका काय निर्णय होणार? यावर तर्क-वितर्काना उधाण आलेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
नागपूरमध्ये भाजपच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना कल्याणच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील, हे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कोणताही विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. पूर्ण ताकदीने आणि गेल्यावेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही निवडून आणू. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा ही महायुती त्यांना निवडून आणेल, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे महायुतीचा कल्याणमधील तिढा संपल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.



