मुंबई – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज रियल इस्टेट क्षेत्राला चांगलाच बुस्ट मिळाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यभरात सुमारे १२ हजार हुन अधिक घरांचे बुकिंग झाले आहे. दरम्यान सदरचे बुकिंग मुंबईच्या तुलनेत ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात जास्त आहे. आज केवळ बुकिंग झाले असून त्याची नोंदणी येत्या महिनाभरात होणार आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सर्वसामान्यांकडून घर खरेदी, सोने खरेदीला पसंती दिली जाते. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या पत धोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृह कर्जाचा दर स्थिर असतानाच सोन्याने मात्र ७० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
त्यामुळे नागरिकांनी सोन्याऐवजी घर खरेदीला पसंती दिली असल्याचे नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे (एनएआरईडीसीओ) महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी सांगितले. एरव्ही दररोज होणाऱ्या घर खरेदीच्या तुलनेत आज पन्नास टक्क्यांहून अधिकच वाढ झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



