नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी जाहीर केलेल्या दहाव्या उमेदवार यादीत चंदीगडमधून किरण खेर आणि अलाहाबादमधून रिटा बहुगुणा जोशी यांची तिकीटे कापण्यात आली आहेत. मात्र रायबरेलीसह वादग्रस्त ब्रिजभूषणसिंह यांचा कैसरगंज तसेच उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा, आणि पूनम महाजन यांच्या दक्षिण मध्य मुंबई यासारख्या चर्चित मतदारसंघांतील पत्ते भाजपने अजूनही उघडलेले नाहीत. भाजपने चंदीगडमधून किरण खेर यांना निरोप देताना संजय टंडन यांना तर अलाहाबादमधून रीता बहुगुणा यांच्याएेवजी नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ पक्षनेते एस एस अहलुवालिया पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
मैनपुरीमध्ये सपा नेत्या डिंपल यादव यांच्यासमोर योगी आदित्यनाथ यांचे मंत्री जयवीरसिंह ठाकूर तर दिवंगत पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या बलिया या पारंपारिक मतदारसंघातून त्यांचे पुत्र नीरज शेखर हे निवडणूक लढवणार आहेत. बलियाचे खासदार वीरेंद्रसिंह मस्त यांनाही नारळ देण्यात आला आहे.


