कराड : महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असेल तर त्यांनी त्यांची तयारी करावी. आमची तर तयारी झालीच आहे. लोकांच्या मनात काय आहे? हे लोकं ठरवतील. बऱ्याचशा गोष्टी आज बोलण्यापेक्षा लवकरच त्या उघडकीस येतील, असे सुचक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता आज येथे दिला.
मतदार संघाच्या संपर्क दौऱ्यादरम्यान खासदार भोसले यांनी आज कऱ्हाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान ते बोलत होते. सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भरत पाटील, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, पैलवान धनाजी पाटील, सुनिल काटकर आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, लोकसभेचा उमेदवार म्हणूनच मी संवाद साधत आहे. भाजप निश्चीतपणे निर्णय घेईल. काही अडचणी असतात. सातारा हा नेहमी राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असतो. या सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. लहान लग्नाच्या याद्या करणे सोपे असते. हे मोठं लग्न आहे.
महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला असेल तर त्यावर मी चर्चा करणे योग्य होणार नाही. पण एखाद्या माणसाचे कॅरेक्टर बघायचे असेल तर त्यांनी १५-२० वर्षाच्या कालावधीत संबंधित माणसाची वैयक्तीक वाटचाल कशी झाली आहे, हे पहावे. त्यातुन तुम्हाला त्यांच्याकडून समाजसेवा किती घडली आणि काय घडली ? हे समजेल. नावं ठेवणे हे मी कधी करत नाही. बऱ्याचशा गोष्टी आज बोलण्यापेक्षा लवकरच त्या उघडकीस येतील, असेही सुचक वक्तव्य त्यांनी केले.


