नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. छगन भुजबळ यांना ब्राह्मण महासंघ, पुरोहित महासंघ आणि सकल मराठा समाजाकडून होणाऱ्या विरोधामुळे पुन्हा भुजबळांच्या संदर्भात भाजपकडून नव्याने सर्वेक्षण सुरू असल्याचं बोलल जात आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी, अशी दिल्लीतूनच चर्चा असल्याचे देखील माहिती समोर आले होते. मात्र, छगन भुजबळ यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट घालण्यात आल्याचं सांगण्यात आले. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी या सर्व चर्चांवर पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळालं.
नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी केव्हा जाहीर होईल, या संदर्भात छगन भुजबळ यांनी महायुतीचे सर्व नेते एकत्र बसतील आणि जेव्हा करायचा तेव्हा निर्णय घेऊन नावाची घोषणा करतील, असं भुजबळ म्हणाले. नाशिकची निवडणूक ही शेवटला असल्याचं सांगत भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात अजून तरी एकमत न झाल्याच स्पष्ट केलं आहे.
छगन भुजबळ यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशाचर्चा आता सुरू झाल्या आहेत. मात्र, या चर्चांचं खंडन करून छगन भुजबळ यांनी ही सगळी बातमी खोटी आहे आणि अतिशय चुकीची आहे, असे म्हटले आहे. या चर्चांना कशाचाही आधार नाही. अजित पवारांनी नाशिकची जागा मागितली आहे, मात्र नाशिक लोकसभेतून अजित पवार आणि प्रफुल पटेल यांना नाशिकची जागा घ्यायची असेल तर नाशिकमधून छगन भुजबळ यांनाच उभे करा असे सांगितले आहे. यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही आणि मला निवडणूक लढण्यासाठी कुठलीही अट टाकली नाही, कोणत्या चिन्हावर लढायचं या संदर्भात देखील मला कोणतीही अट नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे.



