सांगली : शिवसेनेच्या उमेदवाराचा कुठेही बेस नाही, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आता तरी याची जाणीव करून घ्यावी. परिणामी, शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार असल्याचे खळबळजनक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर कार्यकर्त्यांचाच नाही तर माझाही हिरमोड झाल्याचेही पटोले म्हणाले.
सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही
सांगलीच्या जागेवरती ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र इथून विशाल पाटलांनी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून असे दोनही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशातच या जागेवर ठाकरे गटाने आपला उमेदवार मागे घेतला तर काँग्रेसचा एबी फॉर्म तयार असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. मात्र जर ठाकरे गटाने आपला उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटलांची समजूत काढू असेही नाना पटोले म्हणाले. सांगलीची जागा अलायन्समध्ये सुटली आहे. आम्हाला हे माहित आहे की सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराचा मुळात कुठेही बेस नाही. तरीसुद्धा आम्हाला महाविकास आघाडी म्हणून त्याच्यासाठी काम करावे लागणार आहे.
परिणामी, काल विश्वजीत कदम, विशाल सावंत आणि पृथ्वीराज पाटील तिघांना महाविकास आघाडी सोबत राहण्याची सूचना आम्ही केल्या आहेत. असे असले तरी सांगलीची जागा शिवसेनेला सुटल्यानंतर केवळ कार्यकर्त्यांचाच नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झाला असल्याची खंतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केली आहे. मात्र आम्ही महाविकस आघाडी मध्ये घटक पक्ष असल्याने आम्हाला आघाडी धर्म निभावावे लागते, असेही पटोले म्हणाले.



