सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत लेखी सूचना देत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करा असे आदेश दिल्याने दोन्ही उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. वकिलांचा फौजफाटा घेत दोन्ही उमेदवार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताना माध्यमांना माहिती दिली. दोन वाजेपर्यंत आमचे वकील सर्व कागदपत्रे सादर करतील अशी माहिती दिली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या सहा सभा
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 24 एप्रिल, 26 एप्रिल, 28 एप्रिल आणि 2 मे रोजी शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात येणार आहेत. सभा घेत मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शुक्रवारी वेळापुरात एकाच व्यासपीठावर आले होते. तीस वर्षांचं राजकीय वैर विसरून माढा मतदारसंघात उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील एकत्र आले आहेत. माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील यांनी देखील असे स्पष्ट केले आहे, माढ्यात आता नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली आहे.



