सांगली : पश्चिम महाराष्ट्रील राजकारणाचं केंद्रस्थान असलेला सांगलीचा किल्ला कोण राखणार? लोकसभेची पाटीलकी कोणते पाटील बाजी मारणार अशी चर्चा सांगली जिल्ह्यात सुरू आहे. महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपात ठाकरे गटाने बाजी मारली खरी पण तिकीट न मिळाल्याने काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
अखेर आता सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांची बंडखोरी कायम असणार आहे. अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने आता अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील निवडणूक लढवतील. त्यामुळे आता विशाल पाटलांचा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आज दुपारपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नसल्याने आता सांगलीत त्रिशंकू लढत होणार आहे.
- लोकसभेसाठी तीन पाटलांच्यात लढत
काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपाचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणार असणार आहेत. त्यामुळे चांगली लोकसभेची पाटीलची कोण करणार अशी चर्चा सांगली जिल्ह्यात सुरू झाली आहे.
आत्तापर्यंत 25 पैकी शेवटच्या दिवशी पर्यंत 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. सांगलीतल्या विशाल पाटलांच्या वसंतदादा भवन या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. त्यामुळे विशाल पाटील मागे हटणार नाहीत, हे निश्चित झालं होतं. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. वेळ संपण्यापूर्वी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
सांगलीचं राजकीय गणित
१९५२ ते २०१९ पर्यंत दोन वेळा झालेल्या पोटनिवडणुकांसह १९ निवडणुका पार पडल्या आहेत. यात काँग्रेसने १६ वेळा विजय साकारलाय. तर 1980 ते 2014 या काळात म्हणजे 34 वर्षात वसंतदादा पाटील घराण्याचंच या मतदारसंघावर वर्चस्व राहिलंय. 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी प्रतिक पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली. मात्र विशाल पाटील यांना संजयकाका पाटील यांनी धुळ चारत सलग दुसऱ्यांदा सांगलीत कमळ फुलवलं.
दरम्यान, काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विशाल पाटील यांना विधान परिषदेचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर बाळासाहेब थोरातांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी विशाल पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, तरी देखील विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. याचा फायदा आता भाजपला होणार का? असा सवाल विचारला जात आहे.



