मुंबई : मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयातील मंडपाला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीमुळं परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाला आग लागली अशी माहिती, सर्वत्र पसरल्यानं भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांची एकच खलबल उडाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड हे घटनास्थळी दाखल झाले.
दहा मिनिटात आगीवर नियंत्रण : देशभर सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. असं वातावरणात मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयातील सभा मंडपाला आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. भाजपा प्रदेश कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असल्याचं सांगितलं जातय.
शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. आग लागल्याबरोबर प्रदेश कार्यालयात आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले. या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी काही क्षणात कुलाबा फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून साधन सामुग्रीचंही नुकसान झालं नसल्याचं भाजपा नेते, आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलंय.


