
गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेल्या गुन्हेगाराचा पाठलाग करताना गुन्हेगाराने पोलिस पथकावर पिस्तूलातून गोळी झाडली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गुन्हेगारावर तीन राऊंड फायर केले. यानंतर त्याच्या दुचकीला गाडी आडवी घालून त्याला साथीदारासह जेरबंद केले. हा थरार एनडीए परिसरातील मुठा रस्त्यावर मंगळवारी दुपारी घडला. या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलिस पथकाला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
काय आहे प्रकरण ?
नवनाथ निलेश वाडकर (१८ रा.जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. केतन साळुंखे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पत्रकारावरील हल्यातील गुन्हेगार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नवनाथ वाडकर हा सराईत गुन्हेगार आहे. तो सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देत नवनाथने पळ काढला होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तेव्हापासून खंडणी विरोधी पथक त्याच्या मागावर होते. तो मुठा परिसरात पिस्तूल घेऊन आला असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण यांचे पथक दोन कारमधून त्याच्या मागावर गेले.



