“मुंबईः बीड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. बीडच्या परळी, केज आणि धारुर तालुक्यात बोगस मतदान केल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. त्यांनी तशी तक्रारदेखील निवडणूक आयोगाकडे केली आहे. आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करत आवाज उठवला आहे. आता खुद्द शरद पवार यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शरद पवार म्हणाले की, बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचे प्रकार घडले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. असे प्रकार घडत असतील तर काळ सोकावू शकतो. लोकांना मतदान न करु देण्याचे गंभीर प्रकार बीडमध्ये घडलेले आहेत. तसेच प्रकार बारामती येथेही घडले आहेत, असं म्हणत कठोर कारवाई करण्याची मागणी पवारांनी केली आहे.



