मुंबई : लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होत असताना राज्यात आणि देशात नेमका कौल काय असेल याबाबत चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यांनंतर अजित पवार हे काही नेत्यांना घेऊन महायुतीत सामील झाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही नेते परतही आले. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन महत्वाचे नेते सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि सोनिया दुहन पक्षाला रामराम करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. धीरज शर्मा हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धीरज शर्मा यांनी जरी पक्षातील पदांचा म्हणजेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोनिया दुहन या शरद पवार गटातील युवती संघटनेचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करत होत्या. पक्षासाठी त्यांनी प्रवक्ते म्हणूनही काम पाहिले आहे. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन हे सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
धीरज शर्मा यांची फेसबुक पोस्ट
मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे, अशी फेसबुक पोस्ट धीरज शर्मा यांनी लिहिली आहे. ही पोस्ट लिहिताना राष्ट्रवादी पक्षाच्या फेसबुक पेजला, शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना धीरज शर्मा यांनी मेन्शन केले आहे.



